*आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन*
*मारोडा येथे नि:शुल्क रोगनिदान व उपचार शिबिर*
*चंद्रपूर, दि. 3 : प्रत्येक नागरिकाला अद्ययावत आरोग्यसेवा मिळणे हा त्याचा अधिकार आहे. त्यासाठी जिल्ह्यात आरोग्य सुविधांच्या विकासावर भर दिला जात असून यासोबतच चंद्रपूरमध्ये अत्याधुनिक मेडिकल कॉलेज आणि टाटा कॅन्सर केअर हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. विविध आरोग्य शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना वैद्यकीय सेवा पुरविली जात आहेत. मूल येथील ग्रामीण रुग्णालयाच्या विस्तारासाठी 107 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. तसेच या क्षेत्रात स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून प्राथमिक आरोग्य सेवा अधिक सक्षम केली जात आहे. चंद्रपूर जिल्हा आरोग्य क्षेत्रात सदैव अग्रेसर रहावा हाच यामागचा उद्देश आहे, असे प्रतिपादन राज्याचे माजी वने, सांस्कृतीक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.*
आचार्य विनोबा भावे रुग्णालय, सावंगी (मेघे ), मा. आ. श्री. सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्र, चंद्रपूर आणि ग्रामपंचायत, मारोडा यांच्या संयुक्त विद्यमाने निःशुल्क रोगनिदान व उपचार शिबिर तसेच नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. माजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्याताई गुरनुले,जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. महादेव चिंचोळे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, मारोडाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहीतकुमार सिंह, सरपंच भिकारुजी शेंडे,राजेश्वर सुरावार, शैलेंद्रसिंग बैस, सागर खडसे, चंदू मुद्दमवार , नामदेव गुरनुले, राजु वाढई, नरसिंग गणवेलवार, बंडू गेडाम आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
ग्रामीण भागात आरोग्यविषयक सुविधांची अद्यापही कमतरता आहे. यासाठी शिबीराच्या माध्यमातून आरोग्य सेवेचा लाभ देण्यात येत आहे. मागील काही दिवसांपूर्वी मुलच्या जलतरण समितीला 21 लक्ष रुपयांची रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली. जर आपण एका रुग्णाचा जीव वाचवू शकलो, तर ते शंभर रुग्णवाहिकांच्या किमतीहून अधिक मोलाचे ठरेल असा भाव मनात असल्याचे आ. श्री. मुनगंटीवार म्हणाले.
चंद्रपूरमध्ये अत्याधुनिक मेडिकल कॉलेज आणि टाटा कॅन्सर केअर हॉस्पिटल उभारण्यात येत आहे. 140 खाटांचे तसेच रेडिएशनची स्वतंत्र सुविधायुक्त हे हॉस्पीटल असणार आहे. कॅन्सर रुग्णांचे लवकर निदान व्हावे यासाठी 1.30 कोटी रुपये खर्चून कॅन्सर डिटेक्शन व्हेईकल उपलब्ध करून देण्यात आली आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
विशेष म्हणजे, भारतातील पहिली हेलियमचा वापर न करणारी एम.आर.आय. मशीन चंद्रपूरच्या कॅन्सर हॉस्पिटलमध्ये बसवली जात आहे. ही बाब जिल्ह्यासाठी अत्यंत गौरवाची असून, आरोग्य सेवेत मोठी क्रांती घडवणारी आहे, असेही ते म्हणाले.
*ग्रामीण भागांमध्ये आरोग्य सेवांचा विस्तार*
आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी 107 कोटी रुपये खर्चून मूल येथील ग्रामीण रुग्णालयाचा विस्तार करण्यात येत आहे. पोंभुर्णा, बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयासोबतच, आरोग्याच्या सेवा प्रत्येक गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत पाहोचाव्यात यासाठी मतदारसंघात स्मार्ट पी.एच.सी. करण्यात येत आहे. गोरगरीबांच्या आरोग्य सेवेमध्ये सहजता, सरलता आणि सुलभता असावी यादृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहे.
*महिला आरोग्य जनजागृतीवर भर*
स्त्री ही जननी असून जगात महिलेचे स्थान सर्वात मोठे आहे. स्त्री ही सहनशील आहे.मी राज्यस्तरीय गायनिक परिषदेमध्ये उपस्थित राहिलो तेव्हा लक्षात आले की, महिलांमध्ये थायरॉईड, बीपी आणि मधुमेह यांसारख्या आजारांबाबत अद्यापही पुरेशी जनजागृती नाही. त्यामुळे आशावर्कर, अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनी आरोग्याच्या बाबतीत जनजागृती करावी. असे आवाहन आ. श्री. मुनगंटीवार यांनी केले. आरोग्य शिबिरांमध्ये महिलांसाठी विशेष तपासण्या करून त्यांना योग्य उपचार मिळावे. उत्तम आरोग्य हीच सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. मारोडाच्या कर्मवीराच्या भूमीतून उदंड आयुष्य प्राप्त करण्यासाठी उत्तम आरोग्याचा मंत्र घ्यावा. “उत्तम आरोग्य हीच खरी संपत्ती असून, प्रत्येकाने त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे,” असा संदेश आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिला.