चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक, शैक्षणिक आणि पर्यटन विकासाला मिळेल नवी दिशा

4

*आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे केली मागणी*

*आ. मुनगंटीवार यांनी लोकहिताच्या विषयांकडे पत्राद्वारे वेधले लक्ष*

*चंद्रपूर, दि.०८ – चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक, शैक्षणिक व क्रिडा आणि पर्यटन विकासाला नवी दिशा मिळावी यासाठी राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील तरुण, विद्यार्थी आणि बेरोजगारांच्या समृद्धीसाठी त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे व श्री. अजीतदादा पवार यांना निवेदन दिले आहे.*

आमदार श्री. मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात चंद्रपूर जिल्ह्यातील सार्वजनिक हिताच्या महत्त्वपूर्ण विषयांकडे लक्ष वेधले आहे. 2025- 26 चा अर्थसंकल्प सादर करताना काही महत्त्वपूर्ण विषयांच्या अनुषंगाने घोषणा करण्यात याव्यात, अशी मागणी आ. श्री. मुनगंटीवार यांनी केली आहे. यामध्ये फर्निचर क्लस्टर, मूल येथील पॉलिटेक्निक महाविद्यालय, क्रीडा क्षेत्रातील सुविधा, पोंभुर्णा एमआयडीसी, देशातील पर्यटन केंद्रांमध्ये ताडोबाचा समावेश होणे आदी विषयांकडे आ. श्री. मुनगंटीवार यांनी लक्ष वेधलं आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सागवान आता देशात सर्वोत्कृष्ट लाकूड म्हणून नावारुपास आले आहे. आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात बल्लारपूर डेपोतून देशाची अस्मिता अभिमान, आस्था असणारे आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराला लागणारे काष्ठ हे पुरविण्यात आले. तसेच नवीन संसद भवनातील सेंट्रल व्हिस्टा या इमारतीचे काष्ठ देखील बल्लारपूर येथून पुरविण्यात आले. देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या कार्यालयासाठी देखील चंद्रपूर जिल्ह्यातील जगप्रसिद्ध सागवान लाकडाचा उपयोग करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात फर्निचर क्लस्टर करुन जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाचे कार्य करण्याचा मानस श्री. मुनगंटीवार यांनी पत्रात व्यक्त केला. फर्निचर क्लस्टर करिता चंद्रपूर येथील ताडाळी एमआयडीसीमध्ये दहा एकर जागा प्रस्तावित करण्यात आली आहे. फर्निचर क्लस्टरसाठी एफडीसीएममध्ये ७५ कोटी रुपयांची घोषणा करावी, अशी मागणी आ. श्री. मुनगंटीवार यांनी केली आहे. याशिवाय चंद्रपूर जिल्ह्यातील शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने मूल येथे नवीन पॉलिटेक्निकल महाविद्यालयाची देखील अर्थसंकल्पात घोषणा करावी, अशी मागणी आ. श्री. मुनगंटीवार यांनी केली आहे.

गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये विपुल खनिज संपदा उपलब्ध असून या संपत्तीवर आधारित उद्योग मोठ्या प्रमाणावर या भागामध्ये येत आहेत. यासाठी पोंभुर्णा येथे पाच हजार एकरमध्ये एमआयडीसीची घोषणा करावी, अशी मागणी आ. श्री. मुनगंटीवार यांनी केली आहे. हे सर्व विषय चंद्रपूर जिल्ह्यासोबतच विदर्भातील इतर जिल्ह्यांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहेत, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.

*ताडोबा व्हावे आंतरराष्ट्रीय पर्यटन केंद्र*
ताडोबा हे आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने ताडोबा हे सर्व सोयीसुविधायुक्त व्हावे यासाठी केंद्र शासनाकडे याबाबतचा प्रस्ताव सादर करून केंद्र व राज्य सरकार तसेच खाजगी गुंतवणूकदार यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्कृष्ट पर्यटन क्षेत्र करण्याची घोषणा करावी, अशी मागणी आ. श्री. मुनगंटीवार यांनी केली आहे.

*क्रीडा क्षेत्राकडे वेधले लक्ष*
मिशन ऑलिम्पिक २०३६ च्या दृष्टिकोनातून चंद्रपूर येथे पायाभूत सुविधा, क्रीडा विषयक सुविधा अधिक सक्षम करण्यासाठी अर्थसंकल्पात घोषणा करावी. या सुविधांचा उपयोग करुन चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यातील तरुण,तरुणींना ऑलिम्पिकच्या दृष्टीने सक्षम करण्यासाठी राज्य सरकार विशेष लक्ष द्यावे. अशी मागणी आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे व श्री. अजीतदादा पवार यांना पत्रातून केली आहे.