*एसएनडीटी विद्यापीठ प्रकल्पांतर्गत साकारतेय अद्ययावत केंद्र*
*दर्जेदार बांधकाम करण्याचे ना.मुनगंटीवार यांचे प्रशासनाला निर्देश*
विसापूर (बल्लारपूर) येथे आकाराला येत असलेल्या श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञान संकुलाच्या बांधकामाची राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पाहणी केली. या अद्ययावत केंद्राच्या बांधकामाची गुणवत्ता राखण्याचे स्पष्ट निर्देश ना. श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी प्रशासनाला दिले.*
बल्लारपूर येथील विसापूरमध्ये ५० एकर जागेत ६२ अभ्यासक्रम असलेले एसएनडीटी विद्यापिठाचे विदर्भातील मोठे केंद्र निर्माण होत आहे. पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक असलेल्या या केंद्रामध्ये तरुणी व महिलांच्या कौशल्य विकासाला प्राधान्य दिले जाणार आहे. याठिकाणी महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण केंद्र आकाराला येत आहे. या केंद्राच्या बांधकामाची ना. श्री. मुनगंटीवार यांनी पाहणी केली व नियोजित वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. यावेळी वनविकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदन सिंग चंदेल, भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा, शहर अध्यक्ष काशी सिंग, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, उपविभागीय अभियंता संजोग मेंढे आदींची उपस्थिती होती.
केंद्राच्या बांधकामाला सुरुवात झालेली असून यामध्ये वाचनालय, प्रेक्षागृह इमारत, शैक्षणिक इमारत आदींचा समावेश आहे. चंद्रपूरसह आसपासच्या जिल्ह्यांमधील तरुणी व महिलांना कौशल्य विकास प्रशिक्षण घेता यावे, यातून रोजगाराच्या संधी निर्माण होऊन महिलांचे आर्थिक व सामाजिक स्वातंत्र्य जपता यावे तसेच विकासाच्या प्रवाहात महिलांना सामावून घेता यावे, या उद्देशाने पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी एसएनडीटी विद्यापीठाचे केंद्र चंद्रपूर जिल्ह्यात सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने भव्य आणि देखण्या इमारतीच्या निर्माणासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.
या प्रकल्पाचे काम प्रत्यक्षात सुरू झाले असून लवकरच सर्व समाजातील तरुणी व महिलांसाठी कौशल्य विकासाचे एक नवे दालन खुले होणार आहे. याठिकाणी दरवर्षी तीनशे मुलींना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण घेता यावे याकरिता ३०० मुलींचे वसतीगृह करण्याचा देखील ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांचा प्रयत्न आहे. या प्रकल्पाला ५८९.९३ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्रातील एक आगळेवेगळे केंद्र लवकरात लवकर समाजाला समर्पित करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची भावना ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली.