धानाचे भाव साडे तीन हजार रुपये देण्याकरिता आंदोलन करणार

55

*पिकाला येणाऱ्या खर्चा नुसार धानाला प्रति क्विंटल साडे तीन हजार रुपये भाव देण्यात यावा, अशी मागणी विदर्भ वैधानिक विकास मंडळाचे माजी सदस्य आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी केंद्र सरकार, राज्य सरकार यांना खासदार बाळूभाऊ धानोरकर, जिल्हाधिकारी यांचे मार्फत दिले आहे.याकरिता लवकरच शेतकऱ्यांचे आंदोलन उभारण्यात येणार आहे.*

*आधारभूत किमती जाहीर करणे ही बाब केंद्रशासनाच्या अखत्यारीत आहे . प्रत्येक वर्षी पीक उत्पादन खर्च योजने अंतर्गत, खरीप हंगामासाठी चारही कृषी विद्यापीठाकडून पीक उत्पादन खर्चाच्या प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे व विविध निविष्ठा ची प्रचलित भाव पातळी लक्षात घेऊन उत्पादन खर्चावर आधारित किंमती,केंद्रीय कृषी मूल्य व किंमत आयोगा कडे प्रस्तावित करण्यात येतात. केंद्रीय कृषी मूल्य आयोगाची धानाचे भाव ठरवण्याची पद्धत चुकीची आहे धानाचे भाव ठरवितांना त्या त्या भागातील शेतकऱ्यांना समिलित करून त्यांचा शेती च्या उत्पादनावर झालेला खर्च विचारात घेऊन धानाचे भाव ठरविले पाहिजे. केंद्रीय कृषी मूल्य आयोग धानाचे भाव निर्धारित करताना विविध राज्यातील पिकांसाठी येणाऱ्या उत्पादन खर्चाचा विचार करतात. इतर राज्यात विदर्भाच्या तुलनेत सिंचन, अद्यावत यंत्रसामुग्रीचा वापर इत्यादी बाबी विचारात घेतल्या जातात.त्यामुळे पंजाब,हरियाणा व इतर राज्यांच्या तुलनेत मागासलेल्या विदर्भाची तुलना होऊ शकत नाही.येथे सिंचनाची पुरेशी व्यवस्था नाही.*
*वन्य प्राण्यांमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान होते,त्यामुळे दरवर्षी लागत खर्चात वाढ होत असताना मिळणारा भाव अत्यल्प आहे.यामुळे धान उत्पादक भागात शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. मा. शरद पवार हे केंद्रीय कृषी मंत्री असताना त्यांनी धानाला ३२०० , ३३०० रू. प्रति क्विंटल भाव दिला होता.*
*धानाच्य भावाच्या बाबतीत धानाला प्रति क्विंटल 3500 रू भाव न मिळाल्यास शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशी चेतावणी प्रकाश पाटील मारकवार यांनी दिली.*